राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून उठलेलं रान अकेर शमलं आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारविरोधात दिलेला लढा यशस्वी झाला असून सरकारनं भाषा सक्तीचा जीआर मागे घेतला आहे. याच गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी मनसे आणि शिवसेनेच्या वतीने संयुक्तीकरित्या विजयी मेळावा साजरा करण्यात येत आहे. मोर्चा काढण्यात येणाऱ्या 5 जुलै रोजीच हा विजयी मेळावा साजरा होत असून त्याची जागा अखेर निश्चित झाली आहे. त्याबाबतचे निमंत्रण पत्रक शिवसेना आणि मनसेच्या वतीने सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी, 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वरळीतील एन. एस. सी. आय. डोम येथे हा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. 2 जुलै रोजी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वरळी डोमची पाहणी केली होती. त्यानंतर आता या स्थळावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
काय म्हटले आहे निमंत्रणासोबत -
आवाज महाराष्ट्राचा,
आवाज मराठी माणसाचा,
आवाज ठाकरेंचा!
इतिहास साक्ष आहे...
मराठी माणसावर झालेल्या प्रत्येक अन्यायावर वार करत, आपण नेहमीच आपला आवाज बुलंद केलाय. 'हिंदीसक्ती' विरोधात उभारलेल्या लढ्यामध्ये ह्याच बुलंद आवाजाची प्रचिती पुन्हा एकदा आली. आपण एकत्र आहोत म्हणून सरकारला माघार घ्यावी लागली. मराठी माणसाची एकजूट जिंकली !
चला, हा विजयी क्षण साजरा करूया, आवर्जून उपस्थित रहा !
उद्धव ठाकरे - राज ठाकरे
हेही वाचा