थोडक्यात
आयफोन 17 च्या सिरीजच्या विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे.
अनेकांनी तर, प्री- बुकिंग करण्यात आले.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील अॅपल स्टोअरबाहेर रांग लावली होती.
I Phone-17 : मुंबई आणि दिल्लीमध्ये आयफोन 17 सिरीजच्या विक्रीस सुरुवात होताच ग्राहकांची झुंबड उडाली. गुरुवारी रात्रीपासूनच शेकडो ग्राहकांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील अॅपल स्टोअरबाहेर रांग लावली होती. तब्बल 10 तास रांगेत उभे राहिल्यानंतर शुक्रवारी सकाळी विक्रीस सुरुवात झाली.
नवीन डिझाइन, जास्त क्षमतेची बॅटरी आणि A19 बायोनिक चिप ही आयफोन 17 सिरीजची प्रमुख आकर्षणे ठरत आहेत. अनेक ग्राहकांनी रात्रीभर थांबून आयफोन 17 प्रो मॅक्ससाठी उत्साह व्यक्त केला. एका ग्राहकाने सांगितले की, "यावेळी डिझाइन खूप वेगळे आहे, गेमिंगचा अनुभवही उत्तम मिळणार आहे."
तथापि, प्रचंड गर्दीमुळे मुंबईतील BKC स्टोअरबाहेर गोंधळ उडाला. पहिल्यांदा फोन मिळवण्याच्या स्पर्धेत ग्राहकांमध्ये हातापायी झाली. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
दिल्लीतील साकेत अॅपल स्टोअरबाहेरही अशीच स्थिती पाहायला मिळाली. मॉलच्या बाहेरपासून आतपर्यंत ग्राहकांची लांबलचक रांग लागली होती. काहींनी सांगितले की, हा मॉडेल आयफोन 15च्या तुलनेत कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरी या सर्व बाबतीत चांगला अपग्रेड आहे.
अॅपलने आयफोन 17 सिरीजची किंमत 82,900 रुपयांपासून ते 2,29,900 रुपयांपर्यंत ठेवली आहे. प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांना आजपासून नवीन आयफोन मिळू लागला असून, पहिल्या दिवशीच या फोनसाठी लोकांचा प्रचंड उत्साह दिसून आला.