इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला असून दोन्ही देश एकमेकांवर तीव्र हल्ला करत आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ताणले आहेत. या दोन्ही देशांत जबरदस्त बॉम्बिंग सुही आहे. यात आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा बळी गेला असून शेकडो इमारतींचे नुकसान झाले आहे. अशात आता युद्धाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमिवर इराणी अधिकाऱ्यांनी नागरिकांना व्हाट्सअॅप आणि इतर काही सोशल मीडिया अॅप डिलीट करण्यास सांगितलं आहे.
इस्रायलशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्सअॅपला पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आले आहे. इराणच्या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, व्हाट्सअॅप प्लॅटफॉर्मद्वारे इस्रायली गुप्तचर संस्था इराणची माहिती हॅक करु शकते. इराण असं म्हणालं आहे की, व्हाट्सअॅपद्वारे एखाद्याची खाजगी माहिती कोणीही हॅक करु शकतो. यावर व्हाट्सअॅपने असा दावा केला आहे की, आमची एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन सिस्टम युजरची खाजगी माहिती सुरक्षित ठेवते तसेच सरकारना डाटा पुरवला जात नाही वा मॅसेज कंटेन्टला ट्रॅक केले जाऊ शकते. मात्र तरी देखील इराणकडून संवादासाठी सर्वाधिक वापर होणाऱ्या व्हाट्सअॅप सारख्या अॅपला टार्गेट करण्यात आलं आहे.
इराण आणि इस्त्रायल यांच्या वादात इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरान पेटलं आहे. तेहरानमध्ये अनेक भागात इस्त्रायलने हल्ला केला आहे. इस्त्रायलने पूर्वेकडील भागात नोबोन्याद क्षेत्राजवळ एक मोठा स्फोट केला असून महत्वाच्या ठिकाणी असे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.