थोडक्यात
भुजबळांचं पक्षातलं ‘स्टारडम’ संपलं?
स्टार प्रचारक यादीतून वगळ्याने चर्चांना उधाण…
राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या नेत्यांची नावे…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान राज्यामध्ये काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मात्र सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यात आता भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 साठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या नेत्यांची नावं म्हणजे स्टार प्रचारकांची नावं जाहीर केले आहेत. मात्र या यादीमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांचं नाव नसल्याने पक्षामध्ये भूजबळांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या नेत्यांची नावे…
अजितदादा पवार, प्रफुलजी पटेल, सुनिलजी तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव-पाटील, अण्णा बनसोडे, इंद्रनील नाईक, अनिल पाटील, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, प्रताप पाटील चिखलीकर, नवाबभाई मलिक, सयाजीराव शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, श्रीमती सना मलिक, रूपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दिकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ टी. कांबळे, सुरज चव्हाण, लहू कानडे, कल्याण आखाडे, सुनील मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा देखील येत आहेत. तसेच त्यांच्या ओबीसी समर्थनाच्या भूमिकेमुळे पक्षामध्ये देखील मराठा आणि ओबीसी असे गट पडल्याचं पाहायला मिळालं. तर पक्षातील तसेच सरकारमधील नेत्यांवर देखील भुजबळांनी टीका केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतच्या त्यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी देखील त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या उपस्थितीत रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली होती. या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं होतं. तेव्हा, काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चूकीची करते. पक्षाला किंमत मोजावी लागते, असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांच्या समोरच नाराजी व्यक्त केली होती.
तर त्या अगोदर आरक्षणाच्या विषयावरून भुजबळांनी अजित पवारांच्या भूमिकेवरून टीका केली होती. जेव्हा अजित पवार म्हणाले होतो की, मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात. समाजात तेढ निर्माण करतात. कुणालाही त्यांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण मिळावे. कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. यावर कुणी राजकारण करत असेल तर त्यांना आवर घाला. त्यावर भुजबळ म्हणाले होते की, आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मराठा एक समाज, एक जात आहे. तर ओबीसी हा एक वर्ग आहे. त्यामध्ये अनेक जाती आहेत. त्या सामाजिदृष्ट्या मागासलेले आहेत.
आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे.त्यामुळे भुजबळांची भूमिका, पक्ष आणि विशेषत: अजित पवारांची त्यांच्यावरील नाराजी यातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांच्या यादीतून भुजबळांचं नाव काढून ठाकलं आहे का? या व अशा वेगवेगळ्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.