गिरगावातील प्रतिष्ठित आणि मराठी साहित्य व रंगभूमीची गेली नऊ दशके अखंड सेवा करणारी संस्था मुंबई मराठी साहित्य संघ सध्या निवडणुकीच्या तणावपूर्ण वातावरणामुळे चर्चेत आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सक्रिय सहभागामुळे या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे साहित्य संघाचे “मराठीपण” भविष्यात धोक्यात येईल का, असा प्रश्न साहित्यिक वर्तुळात उपस्थित होत आहे.
1935 मध्ये डॉ. अ. ना. भालेराव यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने साहित्य संमेलनांपासून नाट्यगृह बांधकामापर्यंत अनेक ऐतिहासिक कामगिरी केली. संस्थापक भालेराव आणि त्यांचे सुपुत्र डॉ. बाळ भालेराव यांनी साहित्य संघाला वटवृक्षासारखे विस्तारले. परंतु आज या संस्थेवर राजकीय मंडळींची नजर आहे, अशी चर्चा रंगत असून, संस्थेच्या अस्तित्वाबाबत चिंतेची भावना निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत दोन प्रमुख पॅनेल आमनेसामने आहेत, अभिनेते प्रमोद पवार यांचे भालेराव विचार मंच आणि प्रा. उषा तांबे यांच्या नेतृत्वाखालील ऊर्जा पॅनेल. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नियामक मंडळ अशा महत्त्वाच्या पदांवर कोण येणार हे 1400 मतदार ठरवणार आहेत. मात्र या प्रक्रियेत मतपत्रिका दडवणे, मतदारांची गोंधळ उडवणे यांसारखे गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
लोढा यांचे मतदानाचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर भालेराव मंचला भाजपचा पाठींबा असल्याच्या चर्चा वाढल्या आहेत. संघाच्या जीर्ण इमारतीवर विकासकांचा डोळा असल्याचा आरोप होत असून, गिरगावातील इतर संस्थांच्या जागांसारखेच हे ठिकाणही “गमावले” जाईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
ऊर्जा पॅनेलमध्ये सुदेश हिंगलासपूरकर, विजय केंकरे, अनुपमा उजगरे यांसारखी नावे आहेत, तर भालेराव मंचमध्ये नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, जयराज साळगावकर यांसारखी मंडळी आहेत. अशा सांस्कृतिक आणि राजकीय रंगलेल्या लढतीमुळे गिरगावचा साहित्य संघ पुढेही “मराठी” राहील का, की तो केवळ राजकीय हस्तक्षेपाचा बळी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.vggg