राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक नेते आता आपल्या राजकीय भवितव्यासाठी नव्या पक्षात जाण्याचा विचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची चिन्हं दिसत आहेत. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी नुकतीच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीमुळे त्यांचं भाजप प्रवेशाचं वृत्त अधिकच चर्चेत आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झालेल्या या भेटीत परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. 24 जुलै रोजी सुरेश वरपूडकर यांचा अधिकृत भाजप प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरपूडकर हे सध्या काँग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष असून, जिल्ह्यात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास त्यांच्या नेतृत्वाखालील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही काँग्रेसला रामराम ठोकू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संभाव्य प्रवेशामुळे काँग्रेससाठी परभणीतील राजकारण आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या गोटात अस्थिरता निर्माण होणे, पक्षासाठी मोठं आव्हान ठरू शकतं.