Jacqueline and Parth Pawar viral video : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहिल्याच दिवशी अनेक सेलिब्रिटी आणि व्हिआयपींनी दर्शन घेतलं. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची उपस्थिती विशेष ठरली.
जॅकलिन फर्नांडिसने पारंपरिक वेशभूषा परिधान करून दर्शन घेतलं. डोक्यावर ओढणी घेऊन तिनं मनोभावे प्रार्थना केली. या वेळी पार्थ पवारही तिच्यासोबत होते. दर्शनादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन घेताना पार्थ पवार यांनी त्यांच्या खिशातून काही रक्कम काढून जॅकलिनच्या हातात दिली. त्यानंतर जॅकलिनने ती रक्कम थेट दानपेटीत अर्पण केली. यानंतर दोघांनी लालबागच्या राजाला साष्टांग दंडवत घालत चरणस्पर्श केला आणि दर्शन घेऊन पुढे सरकले.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या श्रद्धेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी या कृतीवरून चर्चा रंगवल्या आहेत. गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात हा प्रसंग अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे.