थोडक्यात
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जळगात आणखीन एक वैष्णवी हगवणे समोर आली आहे.
वाढदिवसांच्या दुसऱ्या दिवशी मयुरीने संपवले आयुष्य
जळगाव शहरातील सुंदरमोती नगर भागात राहणाऱ्या मयुरी गौरव ठोसर (वय 23) या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मयुरीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. मुळची बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी गावची असलेली मयुरीचा विवाह 10 मे रोजी गौरव ठोसरसोबत झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्यावर सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचे तसेच पैशांची मागणी केली जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
9 सप्टेंबर रोजी मयुरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी दुपारी घरात कुणी नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेनंतर 11 सप्टेंबर रोजी मयुरीचे वडील भगवान बुडूकले व नातेवाईक जळगावात दाखल झाले. त्यांनी कठोर कारवाईची मागणी करत पती गौरव ठोसर, सासू, सासरे, दीर व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच, आरोपींना अटक न झाल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला. यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नातेवाईक व पोलिसांमध्ये चर्चेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सासरच्या छळामुळे होणाऱ्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.