मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. धस यांच्या म्हणण्यानुसार, सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून तब्बल 300 कोटी रुपयांची मागणी केली होती, अशी तक्रार त्यांच्या निदर्शनास आली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकर यांनी कथितरीत्या हस्तक्षेप करत हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी शस्त्र परवाना देण्यात मदत केली, असा आरोप यापूर्वीही झाला होता. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करत त्यांची उप महासमादेशक (होमगार्ड) पदावर बदली करण्यात आली होती.
आमदार धस म्हणाले की, "एक आयजी पदावर असलेला अधिकारी लाखो रुपये रोख आणि महागडे मोबाईल घेतो. यापेक्षा दुर्दैव काय असावे?, सुपेकरांबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. नैतिकता हरवलेली आहे." ते पुढे म्हणाले की, "हगवणे कुटुंबाची सुमारे 150 कोटींची मालमत्ता आहे. अशा लोकांनी तुरुंगातून सुटल्यानंतर समाजात जागा मिळू नये."
या गंभीर आरोपांवर सुपेकर यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती आहे. अंजली दमानिया यांनी सांगितले की, 600 प्रकरणांपैकी 300 प्रकरणांचा अहवाल तयार झाला असून, उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे. या चौकशीतून तुरुंगातील भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.