बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत एका महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर या बालिकेच्या मृत्यूचा उलगडा केला असून, ही मुलगी तिच्या जन्मदात्या आई-वडिलांनीच विहिरीत फेकून दिल्याचं उघडकीस आलं आहे. चौथीही मुलगी झाल्याने तिला स्वीकारण्यास नकार देत हे अमानवी कृत्य करण्यात आलं. या प्रकरणात पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून, सध्या त्यांना चंदनझिरा पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
आरोपी सतीश पंडित पवार आणि त्याची पत्नी हे दोघेही वखारी वडगाव तांडा, तालुका जालना येथील रहिवासी आहेत. 12 एप्रिल रोजी या दाम्पत्याने आपल्या एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून दिलं आणि गावात परत गेले. नातेवाइकांनी मुलीबाबत विचारणा केली असता त्यांनी मुलीच्या डोक्यात गाठ झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि तिकडेच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा खोटा बनाव केला.
दरम्यान, पोलिसांना मृत बालिकेचा मृतदेह आढळल्यावर त्यांनी तपास अधिक तीव्र केला. आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी परिसरातील रुग्णालयांमधून नवजात मुली आणि त्यांच्या मातांची माहिती घेतली. तब्बल 1 हजार महिलांची चौकशी करण्यात आली. या सखोल तपासातून अखेर आरोपी पती-पत्नीचा छडा लागला.
हा प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. एका मासूम जीवावर केवळ ती मुलगी आहे म्हणून तिच्या जन्मदात्यांनीच असा क्रूर अन्याय केल्याने समाजमन हादरून गेलं आहे.