(Jammu Kashmir) जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती गावात गुरुवारी दुपारी भीषण ढगफुटी झाली. त्यानंतर आलेल्या पुराच्या पाण्याने मोठा कहर केला असून, आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना अठोली उपजिल्हा रुग्णालयासह जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत.
प्रशासनाने पद्दार येथे यात्रेकरूंकरिता नियंत्रण कक्ष व सहाय्यता केंद्र सुरू केले असून, त्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. चशोती हे माता मंदिराच्या मार्गावरील शेवटचे गाव असल्याने, येथे हजारो भाविक उपस्थित होते. दुपारी 12 ते 1 या वेळेत यात्रेकरू मंदिराकडे 8.5 किमी पायी प्रवासाची तयारी करत असतानाच पाणी आल्याने अनेक जण प्रवाहात वाहून गेले.
घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि लष्करी दल घटनास्थळी दाखल झाले. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, अनेक गावे पाण्याच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. हवामानाचा इशारा आणि कठीण भूभाग लक्षात घेता, बचाव पथके सतत प्रयत्नशील आहेत. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन एकत्रितपणे मदतकार्य करत असून, प्रभावित भागात अन्न, पाणी व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत जम्मू-काश्मीरमधील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका कायम असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाने बचाव कार्यासाठी किमान 20 दिवस लागू शकतील, असा अंदाज वर्तवला आहे.