दहीहंडी म्हटली की मुंबईकरांच्या उत्साहाला उधाण येतं. त्यात घाटकोपरमधील आमदार राम कदम यांची दहीहंडी तर देशातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. दरवर्षी या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने गर्दी जमते आणि बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने दहीहंडीला विशेष झळाळी मिळते. यंदा या दहीहंडी सोहळ्यातील आकर्षण ठरली ती अभिनेत्री जान्हवी कपूर. तिने स्वतः पारंपरिक पद्धतीने मंचावर दहीहंडी फोडून प्रेक्षकांची मने जिंकली.
राम कदम यांची दहीहंडी ही केवळ उंच मनोऱ्यामुळेच नव्हे, तर प्रत्येकवेळी वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या सहभागामुळे चर्चेत राहते. गेल्या काही वर्षांत अनेक बॉलीवूड कलाकारांनी या सोहळ्याची शान वाढवली होती. यंदा जान्हवी कपूरच्या सहभागामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
दहीहंडी सोहळ्यादरम्यान हजारो प्रेक्षकांनी घाटकोपरमध्ये हजेरी लावली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नृत्यपथकांची उपस्थिती आणि गोविंदा पथकांची जिगरबाज साखळी यामुळे संपूर्ण परिसर उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला होता. याच जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर जान्हवी कपूरने मंचावर आगमन केले. साध्या पण आकर्षक पारंपरिक पोशाखात तिने दहीहंडी फोडताच परिसरात जल्लोषाचा गजर झाला.