थोडक्यात
जरांगेंनी शेतकरी महाएल्गार आंदोलनाला भेट दिली
बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनोज जरांगेंनी पाठिंबा दिलाय
मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आलोय
सातबारा कोरा करावा आणि कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा नागपूरमध्ये एल्गार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जाम झाले आहे. सरकारने बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी शिष्टमंडळाला भेटीला बोलावले आहे. त्यापूर्वी आज आंदोलनस्थळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यांनी आंदोलकांना हिताच्या चार गोष्टी सांगतानाच सरकारवर जोरदार प्रहार केला.
मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आलोय
मनोज जरांगे पाटील यांनी मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी आंदोलकांना हुल्लडबाजी न करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी नेतृत्व काय संदेश देत आहे हे नीट ऐकण्याचा सल्ला दिला. त्यांनी मराठा आंदोलनाचे उदाहरण दिले. नेतृत्वाची तळमळ, कष्ट वायाला जाऊ देऊ नका. जे इप्सित साध्य करण्यासाठी आले ते साध्य करण्यावर लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकारचा डाव, प्रतिडावानेच मोडीत काढा
ज्या हेतुसाठी शेतकरी 500 किलोमीटरहून नागपूरमध्ये आले, ते साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी डाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. तर हा डाव प्रतिडावानेच मोडीत काढण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठा आंदोलनावेळी हा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या टप्प्यावर थांबायचे आणि नाही हे मला माहिती नाही. शेतकरी आंदोलनातील टप्पे मी शिकत आहे.
सरकारवर हल्लाबोल
मला या क्षेत्रातील माहिती नाही. शेतकऱ्यांमध्ये फुट पडू नये यासाठी 2 नोव्हेंबरची बैठक रद्द केली. मी शेतकरी आंदोलनातील तज्ज्ञ नाही की अभ्यासक नाही. मला त्यातील कळतही नाही. पण शेतकरी, तज्ज्ञ, माहितीगार यांची बैठक घेण्याचे ठरले होते. आंदोलनामुळे ती रद्द केली. सरकारला घोडे लावल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला. आंदोलनाचा मूळ गाभा समजून घेण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकाकर्त्यांना केले.
तर सरकारने काल डाव टाकला. बच्चू भाऊंना मुंबईला बोलावले. बच्चू कडू यांनी आपल्याला विचारले की मुंबईला चला. पण सरकारला इकडं यायला कोणता रोग आला. त्यांचे पाय मोडले का? त्यांना काय डिझेल लागते की रॉकेल लागते. त्यांना आंदोलनस्थळी यायला काय हरकत होती, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. सगळ्या शेतकरी संघटनांचे बहाद्दर, नेते एकाच जागी आले हे मी पहिल्यांदाच पाहिल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. ही एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.