ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत त्यांच्यावरील आरोपांना जोरदार उत्तर दिले. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असणाऱ्या महिलेच्या आरोपावरील एका प्रकरणावरून अप्रत्यक्षरीत्या फटकेबाजी केली. यावेळी शेरोशायरी करत विरोधकांना थेट आव्हानच जयकुमार गोरे यांनी दिले.
माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले, जिल्ह्यातले काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा करतात आणि काळया बाहुल्या बांधत आलेत . मात्र, जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला
प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर केसेस झाल्या - जयकुमार गोरे
यादरम्यान जयकुमार गोरे म्हणाले की, संपूर्ण राज्य , अख्खा जिल्हा जयकुमार गोरेला अडवण्यासाठी नदीवर जाऊन पूजा करतो, काळया बाहुल्या बांधतो. पण माझं कोणीही वाकड करू शकत नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय आपण हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आला आहे. पण जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत माझे कुणीही वाकड करू शकत नाही. प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर केसेस झाल्या. अशी एकही निवडणूक झाली नाही की जयकुमार गोरेवर केस झाली नाही. प्रत्येक निवडणुकीत मला अडवायचा प्रयत्न झाला. पण मी थांबलो नाही. असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांसह त्यांच्याविरुद्ध महिलेने केलेल्या आरोपाच्या प्रकरणावरही चोख प्रत्युत्तर देत तुफान फटकेबाजी केली.