ताज्या बातम्या

Jayant Narlikar : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन; त्यांच्या पार्थिवावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान विषयक लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Published by : Team Lokshahi

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान विषयक लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्र क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण युग संपुष्टात आलं आहे. डॉ. नारळीकर हे केवळ संशोधक नव्हते, तर विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी मराठीतून सहज आणि रसाळ भाषेत लेखन केलं. 'आकाशाशी जडले नाते' या पुस्तकासह त्यांनी विज्ञान आणि खगोल शास्त्र या विषयांचं लोकाभिमुख रूप वाचकांपुढं आणलं.

कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या नारळीकर यांनी सुरुवातीचं शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात घेतल्यानंतर केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथं त्यांनी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि 'हॉईल-नारळीकर सिद्धांत' विकसित केला. हा सिद्धांत ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबाबत पारंपरिक 'बिग बँग' कल्पनेच्या विरोधात होता. भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील 'आयुका' (IUCAA) या संस्थेची उभारणी केली आणि भारतीय खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

2021 मध्ये ते 'अखिल भारतीय साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांचं योगदान हे भारतीय विज्ञान क्षेत्रात कायमच मार्गदर्शक ठरेल.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत जयंत नारळीकर यांना आदरांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, "ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्याची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले. खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला. वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती. पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Harbour Line Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या..! हार्बर रेल्वे मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक; वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद

Latest Marathi News Update live : बीडमध्ये आज ओबीसींचा महामेळावा

Dive Ghat : आज 'या' वेळेत दिवेघाट राहणार बंद; काय आहे पर्यायी मार्ग?

Elphinstone Bridge : आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन पूल राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणता?