आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, तुमचं सरकार आहे, दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्हाला न विचारता पोलिस लाठीचार्ज करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला न विचारता लाठीचार्ज झाला तर तुम्ही सरकारमध्ये काय करताय? असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, तुम्हाला न विचारता पोलिस एखाद्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करत असतील, तर हे राज्यातील शेंबड्या पोरालाही पटणार नाही. तुम्हाला न विचारता पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल तर त्यासारखी दुसरी गंभीर घटनाच नाही. पोलिसांवर आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्यांवर सरकारचं नियंत्रण नाही, हे यावरून सिद्ध होतं.
आज आपण सर्वांनी राजकारणाचा बारकाईने विचार करा. निवडणुकीत डोळसपणाने मतदान करा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्यापुढे समर्थ पर्याय ठेवू. सर्वांनी ताकदीने सर्व विधानसभा मतदारसंघ उभारा. जळगाव जिल्ह्यात फार पडझड झालेली नाही. तुम्ही सर्व जण एकत्रितपणे जळगाव जिल्ह्यातील सर्वच सर्व आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचे निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला आहे.