राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिकमध्ये आयोजित पक्षाच्या शिबिरात सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षापासून नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, शिबिरात पोहोचून त्यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला. ट्रेन लेट झाल्यामुळे उशीर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल ठाम भूमिका मांडली.
पाटील म्हणाले की, "पाकिस्तानने पहलगामसारखा हल्ला घडवून आणल्यानंतर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणे चुकीचे आहे. भाजप नेतेसुद्धा म्हणतात की खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग क्रिकेट कसकाय खेळायचं?" त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही या सामन्याला विरोध दर्शवला आहे, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
याच शिबिरात रोहिणी खडसे यांनी महिलांविषयी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, महिलांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत आणि पोलिसही मदत करत नाहीत. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या उपक्रमांची आठवण करून देत त्यांनी राज्यात महिला अधिकारांसाठी मोठे आंदोलन उभे करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, ओबीसी आरक्षणासह विविध समाजांच्या मागण्यांवरून महाराष्ट्रात सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी अधोरेखित केले. शरद पवार यांनी राज्यातील सामाजिक आरोग्य बिघडत असल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शिबिरातून अनेक राजकीय संदेशवजा भूमिका समोर आल्याचे दिसते.