बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास १ महिना पूर्ण होत आहे. या प्रकरणामध्ये ८ आरोपींवर खंडणी आणि हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परभणी आणि पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी आज राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही मागणी करणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. याप्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख हत्याप्रकरणात वापरलेल्या गाडीबाबत धक्कादायक दावा केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांना शरण आला. यावेळी तो ज्या गाडीतून आला त्या गाडीवरून राजकारण सुरु झाला. ही गाडी नेमकी कुणाची याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी गाडीच्या मालकाविषयी खुलासा केला आहे.
कोण आहे गाडीचा मालक?
महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडीच्या मालकाचे नाव शिवलिंग मोराळे असल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला आहे. शिवलिंग मोराळे हा अजित दादासोबत झालेल्या सभेत उपस्थित होता. त्याची गाडीही या ताफ्यात होती. तीच गाडी वाल्मिक कराड शरण आला तेव्हा घेऊन आला होता. या गाडीचं उद्घाटन मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. तसा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. यावरून कनेक्शन नाही, प्रुफ नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
सरकारला वाल्मिक कराडला वाचवायचंय- आव्हाड
उपमुख्यमंत्री अजित पवार याविषयी काही बोलत नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य कारवाई करावी. जर पोलिसांतील संशयित तिघांना सस्पेंड केलं, तर तुम्हाला मंत्री धनंजय मुंडेबाबत काय म्हणायचंय असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. धनंजय मुंडे यांनी हत्या केली आहे असं आम्ही म्हणत नाही. मात्र, ज्यांनी हत्या करण्यास मदत केली आहे त्यांच्यावर कारवाई करा. सरकार वाल्मिक कराडला वाचवायचं आहे. विष्णू चाटेला मुख्य आरोपी बनवून वाल्मिक कराडला बाहेर काढायचं आहे.
कर्ता करविता धनंजय मुंडे- आव्हाड
सुदर्शन घुले कोण आहे. त्याची काय औकात आहे असं म्हणत या प्रकरणातील सर्व आरोपी हे २२-२३ वर्षाचे असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. हे आरोपी कौलारू घरातही नाही. या संपूर्ण प्रकरणाचा कर्ता करविता धनंजय मुंडे हेच आहेत. हे मी उदाहरणासकट सांगतो, नावं घेतो. मी दुसऱ्या समाजाचे नाव घेत नाही. वंजारी समाजाच्या त्रस्त लोकांचीच नावं घेतो.
संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा-