Jitendra Awhad : फरार आरोपी गोटा गीतेची आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी; आव्हाडांचा स्पष्ट इशारा – "अशा धमक्यांना घाबरत नाही"
वंजारी समाजात मोठा गदारोळ निर्माण करणाऱ्या प्रकरणात आता नवा वळण आला आहे. फरार आरोपी गोट्या गीते या व्यक्तीने थेट जितेंद्र आव्हाड यांना समाजबाह्य भाषेत धमकी दिली आहे. "जितेंद्र आव्हाड हे वंजारी समाजाचे नाहीत, आणि त्यांना ते महागात पडणार," असा दावा करत गीतेने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तसेच "वाल्मीक कराड हे माझं दैवत असून, धनंजय मुंडे यांना बदनाम करू नका," असेही गीते या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो.
या प्रकारामुळे वंजारी समाजात संतापाची लाट असून, कायद्यापेक्षा वर कुणीच नाही हे पुन्हा अधोरेखित होतंय. या पार्श्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावर परखड प्रतिक्रिया दिली असून, कोणत्याही धमकीला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले आहे.
आव्हाडांची परखड प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड यांनी या धमकीचा समाचार घेत, समाजासमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यांनी गीतेच्या व्हिडिओतील धमक्यांबाबत प्रतिक्रिया देताना ठामपणे सांगितले:
"आणि हे असल्या धमक्यांना घाबरून मी काय… माझं बोलणं, बोलणं बंद करणार का? मी चांगल्यांच्या विरोधात बोलतो. कोण पोट्या आहे, याला कोण… याला कोण भीक घालते? असं काय मी घाबरत-बिबरत नाही." असे म्हटले आहे
आव्हाडांनी हे वक्तव्य करत गीतेच्या धमकीचा जोरदार प्रतिवाद केला आहे. त्यांनी सांगितले की, समाजात होणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या कामात कोणतीही धमकी आड येणार नाही.
काय आहे प्रकरण?
गोट्या गीते नावाच्या आरोपीने सोशल मीडियावरून एक व्हिडिओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले. वंजारी समाजात ते खोटं बोलतात, समाजाच्या भावना दुखावतात, असे सांगत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. तसेच धनंजय मुंडेंबाबत काही बोलल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत गीतेने आपला रोष व्यक्त केला.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरतो आहे. मात्र, संबंधित आरोपी हा कायदेशीर प्रक्रियेतून फरार असल्यामुळे पोलीस तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.