परभणी हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत करण्यात आली होती. मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारची 10 लाखांची मदत नाकारली आहे.
माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मदत घेणार नाही, असे सोमनाथ यांच्या आईने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तर लिहिलेच; त्याचबरोबर देशात स्वाभिमानी जमात जन्माला घातली. मला अभिमान आहे सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा जी परिस्थितीने अत्यंत गरीब आहे, असे असूनदेखील, 'सरकारची भिक आम्हाला नको, सरकारची मदत आम्हाला नको' , आलेले दहा लाख रूपये परत पाठवून दिले. अशा आईच्या पोटी जन्माला यायला भाग्य लागते. या स्वाभिमानी आईला माझा मानाचा मुजरा !
सरकारकडून न घेतलेले दहा लाख रूपये मी त्यांच्या घरी जाऊन देईन; जर आईने घेतले तर ! मला तिचा स्वाभिमान दुखवायचा नाही. पण, खरोखरच मला त्या मुलाला मदत करायची आहे. ज्याच्या मागे कुणीही नाही. त्याच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती अन् त्या भूमिकेचा मी प्रचंड चाहता आहे. जिथे अन्याय- अत्याचार होत आहे; त्याविरोधात आपण उभे राहिलेच पाहिजे, ही डॉ. बाबासाहेबांची शिकवण कायम स्मरणात राहिल. सोमनाथ कसा मेला कुणी मारले
सरकार का लपवून ठेवत आहे. Its a institutional murder पुन्हा एकदा सोमनाथ सुर्यवंशीच्या आईला मानाचा मुजरा !! असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.