सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायासाठी आंबेडकर अनुयायांकडून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. मात्र हा लाँग मार्च मुंबईत पोहचण्याआधीच भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा लाँग मार्च स्थगित करण्यात आला.
यावेळीचा सुरेश धस यांचा एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, "जाऊ द्या, त्याला माफ करा", हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा - त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही.
ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे... अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.