पहलगाममध्ये हिंदूंना धर्म विचारुन गोळ्या झाडल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोप दिला जात आहे. असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होत. अमराठी माणसांवरील अन्याय भाजप खपवून घेणार नाही असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं होत. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मारहाण करण्याचे समर्थन करत नाही. पण उत्साहाच्या भरात मारहाण झाली असेल तर पहलगामच्या घटनेशी जोडणं अतीच झालं. मराठी माणसाला तुम्ही दहशतवादी म्हणत आहात हे चुकीचं आहे. आमचा हिंदीवर दुस्वास नाही, दुराग्रह द्वेषाचे समर्थन देखील नाही. हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला आनंद आहे".
दरम्यान आशिष शेलार म्हणाले होते की, "पण त्यांना मारण्यात तुम्हाला जो काही आनंद होतो आहे ना तो भाजप खपवून घेणार नाही. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहे. म्हणून मर्यादा संभाळून आम्ही भूमिका मांडत आहोत. पण हे प्रकार वाढता कामा नये, मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करेल. त्यामुळे यावर सरकारने कडक कारवाई करावी".