Bihar Love Story : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पटनाजवळील राजीवनगर भागात एका विवाहित महिलेने आपल्या पती आणि मुलीला सोडून पुतण्याशी लग्न करून खळबळ उडवून दिली आहे. आयुषी कुमारी नामक महिलेचा विवाह 2021 साली विशाल दुबे यांच्यासोबत झाला होता. त्यांच्या एका मुलगीही आहे. मात्र काही वर्षांतच गावातीलच तरुण सचिन दुबे जो विशाल दुबेचा पुतण्या आहे. याच्याशी आयुषीचे प्रेमसंबंध जुळले.
सुरुवातीला हे नातं सोशल मीडियावरच्या चॅटिंगमधून सुरू झालं आणि हळूहळू प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू झाल्या. विशालला या नात्याचा संशय आल्यावर त्याने पत्नीविरुद्ध आणि पुतण्याविरुद्ध तक्रार दाखल केली. महिला पोलिस ठाण्यात दोघांची चौकशी झाली, त्यानंतर समझोत्याने आयुषी पुन्हा घरी परतली. पण काही काळातच वाद वाढले आणि आयुषीने सचिनसोबत राहण्याचा हट्ट धरला.
15 जून रोजी आयुषी घरातून पळून गेली. विशालने अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानुसार सचिनवर बंदुकीच्या धाकावर पत्नीला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला. काही दिवसांनी आयुषी आणि सचिनने न्यायालयात आत्मसमर्पण केले. आयुषीने जबाबात स्पष्ट केलं की, ती स्वतःच्या इच्छेने सचिनसोबत राहते आहे.
या सर्व घडामोडींनंतर दोघांनी गावातील मंदिरातच विशालसमोर लग्नगाठ बांधली. गावकऱ्यांचा प्रचंड विरोध पाहता आता ते दोघं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत. मुलगी सध्या वडिलांकडे आहे. पोलिसांनी याप्रकरणात अपहरणाचा गुन्हा निकाली काढला आहे. मात्र ही घटना सामाजिक बंधनांवर आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.