Kalyan-Dombivli government formation calculations changed; MNS group's clear explanation 
ताज्या बातम्या

Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण–डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेची गणिते बदलली; मनसेचा शिंदे गटाच्या शिवसेनेला उघड पाठिंबा

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांना नवे वळण मिळाले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उघड पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

Published by : Riddhi Vanne

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांना नवे वळण मिळाले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उघड पाठिंबा दिल्याने महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. या घडामोडींमुळे केडीएमसीमध्ये स्थिर आणि भक्कम सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत भूमिका मांडताना स्पष्ट केले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देत बसण्यापेक्षा विकासाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. “दररोज उठून कोणी काय बोलतं याला उत्तर देणं आमचं काम नाही. विकासासाठी जेवढे लोक एकत्र येतील, तेवढा शहराचा फायदा होईल,” असे त्यांनी सांगितले.

मनसेचा पाठिंबा विकासासाठीच – श्रीकांत शिंदे

मनसेचे आमदार राजू पाटील हे आपले मित्र असल्याचे नमूद करत श्रीकांत शिंदे म्हणाले की, मनसेलाही शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे वाटत आहे. त्यामुळेच मनसेने महायुतीला, विशेषतः शिवसेनेला, पाठिंबा दिला आहे. “हा पाठिंबा केवळ सत्तेसाठी नाही, तर कल्याण–डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केडीएमसीत गटस्थापना; बहुमताचा दावा

आज कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेच्या ५३ नगरसेवकांनी अधिकृत गट स्थापन केला आहे. यासोबतच मनसेचे पाच नगरसेवकही गटस्थापनेसाठी उपस्थित होते. या प्रक्रियेतून मनसेने शिवसेनेला अधिकृत पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, काँग्रेसचे दोन नगरसेवक तसेच काही अपक्ष व नॉट-रिचेबल नगरसेवक मिळून सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण होत असल्याचे संकेत आहेत.

मात्र, श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की सध्या केवळ शिवसेना आणि मनसे यांच्यातील पाठिंब्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, भाजप आणि शिवसेना युतीनेच सत्ता स्थापन केली जाईल.

महापौर कोणाचा? निर्णय वरिष्ठ पातळीवर

महापौर, उपमहापौर किंवा विविध समित्यांचे अध्यक्ष कोण असतील, याबाबत सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. “या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर, सर्वत्र महायुतीच सत्ता

राज्यात जिथे-जिथे शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीच सत्ता स्थापन करेल, असा ठाम विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. कल्याण–डोंबिवलीप्रमाणेच उल्हासनगर महानगरपालिकेतही महायुतीचीच सत्ता येईल, असे त्यांनी सांगितले.

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी, साई पार्टीचा एक नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक यांनी आधीच पाठिंबा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्थिर सरकार, वेगवान विकासाचा दावा

“सर्व पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली तर विकासाच्या कामांना कुठलाही अडथळा येणार नाही. स्थिर सरकारमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल,” असा दावा करत श्रीकांत शिंदे यांनी सर्व नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.

कल्याण–डोंबिवलीत सुरू झालेल्या या नव्या राजकीय घडामोडींमुळे आता महापालिकेतील सत्तास्थापनेचा मार्ग जवळपास स्पष्ट झाला असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  1. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत सत्तासमोरीकरणाला नवे वळण..

  2. मनसेने शिवसेनेला उघड पाठिंबा दिला, एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली..

  3. महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली.

  4. केडीएमसीमध्ये स्थिर आणि भक्कम सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा..

  5. राजकीय परिस्थिती आता अधिक स्पष्ट आणि निर्णायक झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा