थोडक्यात
आजचा दिवस मराठी टेलिव्हिजनसाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना आहे.
'कमळी' हा कबड्डी विशेष प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला.
'कमळी' ही टाईम्स स्क्वेअरवर दाखवली गेलेली पहिली मराठी मालिका ठरली आहे.
Kamali Zee Marathi Serial Promo At Times Square in New York, USA : आजचा दिवस मराठी टेलिव्हिजनसाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना आहे. 'झी मराठी' च्या सुपरहिट मालिकेतील 'कमळी' हा कबड्डी विशेष प्रोमो अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे 'कमळी' ही टाईम्स स्क्वेअरवर दाखवली गेलेली पहिली मराठी मालिका ठरली आहे. त्यामुळे मराठी भाषा अगदी सातासुम्रदा पार गेल्याचे दिसू आले आहे. या घटनेमुळे मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक खेळ कबड्डीचा जागतिक पटलावर गौरव झाल्याचे दिसून आले आहे.
कबड्डी हा एक मराठी मातीचा खेळ आहे जो सामर्थ्य, चातुर्य आणि संघभावनेचा उत्तम परिचय देतो. 'कमळी' मालिकेतील कबड्डी खेळ त्याचं प्रभावीपणे दर्शन घडवतो. या खास एपिसोडमध्ये टीम कमळी (विजया बाबर) आणि टीम अनिका (केतकी कुलकर्णी) यांच्यातील एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
या ऐतिहासिक क्षणाबद्दल 'कमळी' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली, "कमळी' हे माझ्या करिअरचं केवळ एक काम नाही, तर ते एक अत्यंत प्रेरणादायी आणि जीवनाचा भाग बनलेलं आहे. एका साध्या गावातील मुलीचं स्वप्न, तिचा संघर्ष, आणि जिद्दीनं मिळवलेली यशाची कसरत, हे सर्व मी 'कमळी'च्या पात्रातून अनुभवत आहे. आज 'कमळी' चा प्रोमो न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर दाखवला जात आहे, अशी गोष्ट मी कधीच स्वप्नातही विचारली नव्हती. ही माझीच नाही, तर लाखो मराठी मुलींची गोष्ट आहे, जी आता संपूर्ण जगभर पोहोचते आहे. झी मराठी आणि संपूर्ण टीमला मी दिलेले आभार, ज्यांनी कमळीला इतक्या मोठ्या व्यासपीठावर स्थान दिलं. आज खरंच असं वाटतंय की, आपल्या मातीपासूनच आपल्या यशाचा आरंभ होतो."
या संपूर्ण क्षणाला एकत्र करून पाहिलं तर, हे संस्कृती, खेळ, आणि परंपरेचा अत्युत्तम संगम आहे. 'कमळी' चा प्रोमो टाईम्स स्क्वेअरसारख्या जागतिक पातळीवर झळकणे म्हणजे मराठी अस्मितेचा जगभर गौरव होणे होय.