महाराष्ट्रात सध्या मराठी भाषा आणि तिच्या वापराबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी रविवारी देशातील एकात्मतेचे महत्व अधोरेखित केलं.
हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून खासदार असलेल्या कंगना म्हणाल्या, “भाषेच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रकार चुकीचे आहेत. आपल्याला एकमेकांशी जोडणारे अनेक मार्ग आहेत. आपण माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायला हवे.
त्यांच्या या प्रतिक्रियेचा संदर्भ मुंबईत घडलेल्या घटनेशी आहे, जिथे मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला केवळ मराठी न बोलल्यामुळे धमकावल्याचा आरोप आहे. कार्यकर्त्यांनी त्याला “मराठी येत नसेल, तर महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही,” असे सांगत दुकान फोडण्याची आणि पेटवून देण्याची धमकी दिली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, “मराठी भाषेचा अभिमान असावा, पण भाषेच्या नावावर कोणी गुन्हेगारी कृत्य करत असेल, तर ती सहन केली जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” दरम्यान, कंगना रणौत यांनी रविवारी त्यांच्या मंडी मतदारसंघातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेकांचे जीव गेले असून अनेकजण बेपत्ता आहेत.
कंगनाने स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून त्वरित प्रतिसाद मिळाला असून पंतप्रधान मोदी यांनाही सतत माहिती दिली जात आहे. "सरकारपर्यंत स्थानिक समस्यांची माहिती पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे,” असं त्या म्हणाल्या.