कॅन्टरबरी येथे झालेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत अ संघाकडून करुण नायरनं द्विशतक झळकावले. करुण नायरनं 204 धावांची दमदार खेळी केली आहे. करुण नायरने एका डावात 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 2015/16 च्या हंगामात कर्नाटककडून तामिळनाडूविरुद्ध 328 ही त्याची सर्वोच्च प्रथम श्रेणी धावसंख्या आहे. मागील तीनपैकी दोन वेळा नायरने 200 धावांचा टप्पा ओलांडला होता, परंतु तो नाबाद राहिला.
कॅन्टरबरी येथील सेंट लॉरेन्स ग्राउंडवर झालेल्या इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्यात करुण नायरने रेड-बॉल फॉरमॅटमध्ये आपली शानदार द्विशतकीय कामगिरी सुरू ठेवली. काल रात्रीच्या 186 धावांच्या त्याच्या धावसंख्येनंतर, नायरने आज सकाळीही त्याची उत्तम खेळी सुरू ठेवली. त्याने 273 चेंडूंमध्ये 26 चौकार आणि एक षटकार मारून हा विक्रम केला.
करुण नायरचे हे इंग्लंडमधील दुसरे द्विशतक होते. त्याने 2024 मध्ये नॉर्थम्प्टनकडून ग्लॅमॉर्गनविरुद्ध नाबाद 202 धावा केल्या होत्या. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा नायर हा वीरेंद्र सेहवागनंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे. याआधी, 2015 मध्ये दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ संघासाठी त्याची सर्वोत्तम कामगिरी नाबाद 114धावा होत्या.