चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असलेले नाना पाटेकर हे अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळेदेखील चर्चेत असलेले बघायला मिळतात. नुकतेच ते एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. "जशी पोटगी कायदेशीर आहे तसेच हुंडादेखील कायदेशीर व्हायला पाहिजे" असे विधान त्यांनी केले आहे. या विधानावर करुणा मुंडे यांनी वक्तव्य केले आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या की, "मी एकच सांगते. नाना भाऊ महिलांची जी व्यथा असते त्या आपलं घर, परिवार सोडून स्वत:चं अस्तित्व लपवून पुरुषाचं अस्तित्व निर्माण करते. त्यानंतरही तो पुरुष तिला सोडत असेल, दोन मुलं बाळं झाल्यानंतर रोडवर सोडत असेल तर ती महिला कुठे जाणार? पोटगी नाही मागणार का? त्याच्यावर तुम्ही भाष्य करत आहात. हुंडा कायदेशीर का व्हायला पाहिजे? स्त्री जर नसती तर पुरुष निर्माण झाला नसता",दरम्यान या उत्तराची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
यावेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याबरोबरच्या घटस्फोटाबद्दल आणि पोटगीबद्दलही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, "यायलायाने आम्हाला 29 तारीख दिलेली आहे. आम्ही 29 तारखेला न्यायालयात युक्तीवाद करणार आहोत. आमदारकीच्या निर्णयाबाबत कोर्टाने 1 एप्रिल ही तारीख दिलेली आहे. कोर्टाने मला दोन लाख रुपये मिळावेत असे सांगितले आहे. मात्र मी समाधानी नाही. आम्हाला कमीत कमी 15 लाख रुपये मिळावेत, अशी मागणी आम्ही न्यायालयात केली होती. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करणार आहोत. आम्ही 15 लाख रुपये मागितले होते, तर आता कमीत कमी वाढवून 9 लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी देखील आम्ही केली आहे.