नाशिक तपोवन येथील वृक्षतोडीच्या वादाला आता आणखी वेग आला असून या प्रकरणात करुणा मुंडे यांनीही उघडपणे मैदानात उतरून जोरदार भूमिका घेतली आहे. कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली तपोवन परिसरातील वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप होत असून पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याला मोठा विरोध दर्शवला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या चळवळीत सहभागी होत सरकारवर टीका केली आहे. या वाढत्या आंदोलनात आता करुणा मुंडे यांनी प्रत्यक्ष तपोवनाची पाहणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
करुणा मुंडे तपोवनात पोहोचल्यावर त्यांनी वृक्षतोडीच्या कामांवर कठोर शब्दांत टीका केली. “झाडे कापण्याचे दुष्कर्म सुरू आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो,” असे त्या म्हणाल्या. निसर्गाशी छेडछाड केल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका. साधू-संतांना काँक्रीटच्या जंगलात बंद करू नका. त्यांची तपस्या भंग करण्याचा अधिकार कुणालाच नाही,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या वचनांचा आधार घेत टोला लगावला. “संत तुकाराम म्हणतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे. पण सत्ताधाऱ्यांचे सगेसोयरे अदानी–अंबानी असतील म्हणून त्यांच्यासाठी झाडे तोडायची का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. निसर्ग हा कोणत्याही एका धर्माचा किंवा समाजाचा मुद्दा नसून सर्वांचा असतो, असे सांगत त्यांनी हा विषय हिंदू–अहिंदूच्या चौकटीत न अडकवण्याचा सल्ला दिला.
यावेळी बोलताना करुणा मुंडे यांनी आंदोलकांना पाठिंबा जाहीर करत सरकारला कठोर इशारा दिला. “एक वृक्ष कापला तर आमचा एक–एक पदाधिकारी आत्मदहन करेल,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत दिले. शंकराचार्यांनीही वृक्षतोडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले असल्याचा उल्लेख करत त्यांनी धार्मिक प्रकल्पांच्या नावाखाली निसर्ग नष्ट करण्याचा प्रयत्न असहनीय असल्याचे सांगितले.
तपोवन परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही या वक्तव्यांचे स्वागत करत सरकारने तात्काळ वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. “झाडे कापण्याचा प्रयत्न म्हणजे खून करण्याचा प्रयत्न,” असे सांगत करुणा मुंडे यांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सरकारचीच नसून लोकांचीही असल्याचे नमूद केले. निसर्गाला धक्का लागणे म्हणजे माणसाच्या अस्तित्वावरच गदा येणे, असे सांगत त्यांनी आंदोलनकर्त्यांचा आवाज आणखी बुलंद केला.
तपोवनातील हा वाद आता राजकीय पातळीवर अधिक तीव्र होत असून, सरकारच्या पुढील निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.