पुण्यात रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात काल अनोखं आंदोलन केलं. संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा ही रस्त्यावरच सोडून दिली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे 16 रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं. रिक्षा आंदोलनावेळी चक्काजाम केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे.
काल संध्याकाळी रिक्षा चालकांनी आरटीओ चौकात रिक्षा रस्त्यात लावल्या होत्या. रात्री उशिरा पोलिसांनी येऊन त्या बाजूला केल्या. यावेळी 30-40 रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखेर याप्रकरणी कारवाई करत बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे.