आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे केतकीने नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीवर तिने थेट सवाल उपस्थित करत, “मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का?” असा परखड सवाल विचारला आहे.
केतकी चितळे म्हणाली, “आपण अभिजात दर्जा म्हणतो, पण ‘अभिजात’ हा शब्दच संस्कृत आहे. म्हणजेच त्या भाषेचा दर्जा असा असायला हवा की, ती स्वतंत्र असावी, दुसऱ्या भाषेवर आधारित नसावी. 2024 मध्ये जे क्रायटेरिया ठरवले गेले, ते मला मान्य नाहीत. मी याच्या विरोधात आहे.”
"सगळ्याच भाषांना दर्जा द्या!"
केतकी पुढे म्हणाली, “हा क्रायटेरिया मराठी, बंगाली आणि आसामी भाषांना अभिजात दर्जा देण्यासाठी तयार केला गेला. पण जर भाषांना दर्जा द्यायचाच असेल, तर सगळ्याच भाषांना द्या! एकाच विशिष्ट भाषेला दर्जा देणं म्हणजे इतरांवर अन्याय आहे.”
तिने तिच्या व्हिडीओमध्ये असंही म्हटलं, “माझ्या एका जवळच्या व्यक्तीने मला सांगितलं की, हिंदी आणि उर्दू भाषेलाही अभिजात दर्जा नाही. मग त्यांनाही भांडायला हवं. पण माझं म्हणणं आहे की, ते का भांडतील? ही सगळी गोष्ट केवळ इंसिक्योरिटीमुळे (असुरक्षिततेच्या भावनेतून) आहे. आपल्याला दर्जा हवा, कारण आपण असुरक्षित आहोत. दर्जा मिळाला म्हणजे काय घडलं?”
“मराठी न बोलणाऱ्यामुळे काय नुकसान होतंय?”
मराठी न बोलणाऱ्यांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना केतकी म्हणाली, “मराठीत बोल, असं लोक म्हणतात. पण जो मराठी बोलत नाही, त्याने काय मोठं नुकसान केलंय? भोकं पडतायत का? नाही ना! मग एवढा आक्रोश का? यामागे फक्त स्वतःची असुरक्षितता लपलेली आहे. कोण बोललं, कोण नाही बोललं, याने काहीही फरक पडत नाही.”
वाद वाढण्याची शक्यता
सध्या राज्यात हिंदी-मराठी भाषावाद पेटलेला असतानाच, केतकी चितळेच्या या विधानामुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे. भाषा आणि अस्मितेसाठी झगडणाऱ्यांसाठी केतकीचं हे वक्तव्य धक्कादायक मानलं जात आहे. स्वतः मराठी असूनही अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे तिला समाजमाध्यमांवर तीव्र विरोधाचा सामना करावा लागू शकतो.