बॉलीवूडचे सुपरस्टार शाहरुख खान यांना त्यांच्या आगामी अॅक्शन चित्रपट ‘किंग’च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एक मोठा अॅक्शन सीन शूट करत असताना ही दुर्घटना घडली. यानंतर शाहरुख खान आपल्या टीमसह उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. 59 वर्षीय शाहरुख खान हे त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच पूर्ण ताकदीने परफॉर्म करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या समर्पणामुळेच अनेकदा त्यांना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत.
आता पुन्हा एकदा 'किंग' चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना त्यांना मांसपेशींमध्ये दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर नसली तरी त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली असून, डॉक्टरांनी त्यांना किमान एक महिना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या दुखापतीमुळे ‘किंग’चा पुढील शूटिंग शेड्यूल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल, असे सांगण्यात आले आहे. त्याआधी कोणताही शूटिंग कार्यक्रम न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फिल्मसिटी, गोल्डन टोबॅको आणि वायआरएफ स्टुडिओमध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी 'किंग'च्या शूटिंगसाठी केलेली बुकिंग रद्द करण्यात आली आहे.
यामुळे चित्रपटाच्या एकंदर शेड्युलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘किंग’ ही एक अॅक्शनप्रधान फिल्म असून तिचं शूटिंग भारताबरोबर युरोपमध्ये देखील होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र शाहरुखच्या प्रकृतीनंतर संपूर्ण टीम सध्या प्रतीक्षेत आहे. हे पहिल्यांदाच नाही की शाहरुख खान यांना शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. याआधी ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या तीन पसल्या व डाव्या पायाचा टखना तुटला होता. 1993 मध्येही एका शूटिंगदरम्यान त्यांच्या पायाच्या अंगठ्याला इजा झाली होती.
‘कोयला’, ‘शक्ती’ आणि ‘दूल्हा मिल गया’ या चित्रपटांच्या सेटवर देखील त्यांना विविध गंभीर दुखापती झाल्या आहेत. 'शक्ती'च्या "इश्क कामिना" गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यासाठी त्यांनी यूकेमधील रुग्णालयात उपचार घेतले होते. सध्या शाहरुख खान अमेरिकेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पूर्ण जोमाने शूटिंगला सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावरून ‘गेट वेल सून’ संदेशांचा वर्षाव सुरू झाला आहे.