महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणाऱ्या ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षाची एक नवी शक्यता आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरते आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावर आता शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट भाष्य केलं आहे. “कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल आहे, पण नेत्यांनी लवकर निर्णय घ्यायला हवा. नाहीतर राजकारणाची ट्रेन सुटून जाईल,” असं सूचक आणि ठाम वक्तव्य करत पेडणेकर यांनी युतीच्या चर्चांना नव्याने धार दिली आहे. दोन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “खालच्या स्तरावर आमच्याकडे मनभेद नाहीत. 90-95 टक्के कार्यकर्ते मनाने एक झाले आहेत. फक्त आता नेतृत्वाने पुढचा निर्णय घ्यावा.”
रक्तदान दिनानिमित्त दोन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येताना दिसले, आणि तो प्रसंगही त्यांनी ‘पराक्रम’ म्हणून वर्णन केला. पेडणेकर म्हणाल्या, “आज जे रक्तदान शिबिर झालं, ते विनीज बुकात नोंदवलं जाईल इतकं मोठं कार्य होतं. यात मनसे कार्यकर्त्यांचाही हातभार होता. हे संकेत नाहीत का?" दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी युतीच्या प्रस्तावावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “दोन वेळा आमचं तोंड पोळलं आहे. यावेळी प्रस्ताव तुमच्याकडून यायला हवा,” असं ते म्हणाले. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “होय, भूतकाळात काही गोष्टी आमच्याही अंगावरून गेल्या. पण याचा अर्थ भविष्य बंद नाही होत. आम्ही विचार करतोय. आणि आमच्यासारख्यांचा पाठिंबाही कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आहे.”
किशोरी पेडणेकर यांचं भावनिक आवाहन अधिकच लक्षवेधी ठरतंय. “हे दोन भाऊ आहेत. नातं आहे. ध्येयधोरणही जवळपास एकसारखं आहे. आता युतीसाठी दोघांनीही लवकर विचार करावा. तू-तू, मी-मी करत बसलो तर गाडी सुटून जाईल,” असं सांगताना त्या स्पष्ट करतायत की ही केवळ राजकीय नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची घडी आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप या संभाव्य युतीबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र कार्यकर्ते सज्ज आहेत, जनमतही एकत्र येण्याच्या बाजूने झुकत आहे. अशा वेळी किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य ही केवळ चर्चा नव्हे, तर एक महत्त्वपूर्ण राजकीय सिग्नल मानला जात आहे.