दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन सुरु होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. यावेळी निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले . ज्यामुळे त्या आता चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. मर्सिडिज दिल्यानंतरच पद मिळतं असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याचा आता मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला जात आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रियादेखील उमटल्या आहेत. अखिल चित्रे यांचे यासंदर्भातील ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
अशातच आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील निलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्या म्हणाल्या की, "तीन वेळा आमदार, दोन वेळा उपसभापती झाल्या. या बाईजणे किती आणि कोणाला मर्सिडिज दिल्या? हे सांगावं. ती कधीही माझी सहकारी नव्हती. स्वतःला हुशार समजणारी बाई काहीही बरळते. यांना दरवेळी सगळं न मागता मिळत गेलं. त्यामुळे त्यांना आता चरबी आली आहे. त्या आता पदाशिवाय राहू शकत नाहीत. माश्यासारख्या तळमळत आहेत".
पुढे त्या म्हणाल्या की, "जेवढं या उद्धव ठाकरेंवर बोलतील तेवढी यांना बढोतरी मिळेल असे वाटत आहे. ही एक विकृती आहे. आम्ही महिला समोर आल्या आहोत. ही बाई फक्त मंचावर बोलणारी आहे. ती आमच्यासमोर राहणार नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटणार".