(Kishtwar Cloudburst ) जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या महापूरात मृतांची संख्या 65 वर पोहोचली असून सुमारे 100 नागरिक बेपत्ता आहेत. पावसाच्या अडथळ्यांवर मात करत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, सैन्य व स्थानिक स्वयंसेवक शुक्रवारी (15 ऑगस्ट 2025) बचाव कार्यात गुंतलेले होते.
ही दुर्घटना गुरुवारी (14 ऑगस्ट 2025) दुपारी 12:30 वाजता चिसोटी या गावात घडली. हेच गाव मचैल माता यात्रेच्या मार्गावरील शेवटचे वाहनमार्गाने पोहोचणारे ठिकाण आहे. यात्रेसाठी आलेल्या गर्दीमुळे गावात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. प्रचंड पाण्याच्या लाटांबरोबर माती व दगडांनी गाव झोडपून काढले. आतापर्यंत 46 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यात 2 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) जवानांचाही समावेश आहे.
बचाव पथकांनी 167 जखमींना सुरक्षित बाहेर काढले असून 69 लोकांच्या बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या आपत्तीत घरे, मंदिरे, सरकारी इमारती, पूल, पाणचक्क्या व वाहने यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात्रेसाठी लावलेले बाजारपेठेचे स्टॉल, लंगर व सुरक्षा तळही पुराच्या तडाख्यात कोसळले. गुरुवारी रात्री उशिरा बचाव मोहीम थांबवावी लागली होती, परंतु शुक्रवारी पहाटे पुन्हा सुरू करण्यात आली. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर वापरता आले नाहीत, त्यामुळे NDRFचे पथक रस्त्याने उधमपूरहून पोहोचले.