कोकण रेल्वे मार्ग सध्या एकेरी असल्यामुळे अनेक वेळा गाड्यांचे वेळापत्रक बिघडते व प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाड्यांची संख्या वाढून प्रवास अधिक गतीशील व सोयीचा होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन दशकांत कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली असली, तरी गाड्यांची संख्या तितकीशी वाढलेली नाही. यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागतो. कोकण रेल्वेचा रोहा ते ठोकुर हा 739 किमीचा मार्ग आहे. यातील रोहा-वीर (46.8 किमी) टप्प्याचे दुहेरीकरण ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र त्यानंतर कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.
कोकण मार्गावरून केवळ स्थानिकच नव्हे, तर अन्य राज्यांकडे जाणाऱ्या अनेक गाड्याही धावत असल्याने या मार्गावरील वाहतुकीचा भार मोठा आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 20,056 प्रवासी गाड्या आणि 6,170 मालगाड्या या मार्गावरून धावल्या. सध्या दररोज सरासरी 55 प्रवासी गाड्या आणि 17 मालगाड्या चालतात. टप्पा दुहेरीकरणानंतर ही क्षमता दुप्पट होण्याची शक्यता आहे.
खेड-रत्नागिरी, कणकवली-सावंतवाडी आणि मडगाव-ठोकुर या मार्गांवर टप्पा दुहेरीकरणाचे नियोजन असून, यासंबंधीचा सविस्तर अहवाल रेल्वे मंडळाकडे सादर केला जाणार आहे. मान्यता आणि निधी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.
हेही वाचा