छत्रपती संभाजीनगर
'एक निःस्वार्थ निर्णय, एक अद्वितीय ग्रीन कॉरिडॉर आणि सात जीवांना मिळाले आयुष्य'. बीड जिल्ह्यातील वांगी येथील ३७ वर्षीय गोकुळदास बाबुराव कोटुळे यांच्या अवयवदानामुळे सात रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. गंभीर अपघातानंतर गोकुळदास यांना गॅलेक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. सर्व वैद्यकीय प्रयत्नांनंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या कठिणप्रसंगी त्यांच्या पत्नी कोमल कोटुळे, वडील बाबुराव कोटुळे आणि भाऊ दत्तू कोटुळे यांनी अवयवदानाचा धाडसी आणि प्रेरणादायी निर्णय घेतला.
अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेची तपशीलवार माहिती -
1. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्येच एका रुग्णाला यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आला.
2. हृदय रिलायन्स हॉस्पिटल, मुंबई येथे
3. लिव्हर ग्लेनईगल्स हॉस्पिटल, मुंबई येथे
4. फुफ्फुसे (lungs)केडिया हॉस्पिटल, अहमदाबाद येथे
5. नेत्र (कॉर्निया) आणि दुसरी किडनी स्थानिक MGM रुग्णालयात हस्तांतरित
वैद्यकीय टीम -
न्युरोसर्जन डॉ. विजय मुंढे, न्युरोफिजिशियन डॉ. राहुल वहाटुळे, तसेच डॉ. विनोद चावरे, डॉ. अमोल खांडे, डॉ. बालाजी बिरादार यांनी आयसीयुमध्ये उपचार दिले. अवयव काढण्याची प्रक्रिया नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. वाजिद मोगल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, ज्यात डॉ. अभिमन्यू माकणे, डॉ. उमेश काकडे, डॉ. देवेंद्र लोखंडे, डॉ. सुजाता चांगुळे आणि डॉ. जयेश टकले यांचा समावेश होता. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. सुदर्शन जाधव, डॉ. अभय महाजन, डॉ. प्रदीप सरूक आणि डॉ. अरुण चिंचोळे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.
ग्रीन कॉरिडॉरचे यश -
छत्रपती संभाजीनगर पोलीस विभागाच्या तत्परतेने आणि सहकार्यामुळे आवश्यक अवयव योग्य वेळी संबंधित रुग्णालयांमध्ये पोहोचविणे शक्य झाले. ZICC संस्थेच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पडली.