राज्यातील चर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. ई-केवायसी तपासणीदरम्यान या योजनेत 12,431 पुरुषांनी नियमभंग करत लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात सुमारे 164 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा खुलासा माहितीच्या अधिकारात करण्यात आलेल्या अर्जातून झाला आहे.
राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरलेल्या या योजनेचा गैरवापर केवळ पुरुषांनीच नाही, तर 77,980 अपात्र महिलांनीही 13 महिन्यांचे हप्ते घेतले, अशी माहिती समोर आली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपये दिले जात असल्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे.
योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीला गोंधळ निर्माण झाला होता, ज्याचा फायदा घेत काही अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी 'मलिदा' लाटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढा मोठा घोटाळा समोर आल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारकडे लाभार्थ्यांची आधार कार्ड आणि बँक खात्यांची माहिती असतानाही दोषींवर कारवाई का होत नाही, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
थोडक्यात :
164 कोटींचा आर्थिक घोटाळा
12,431 पुरुषांनी अवैधपणे लाभ घेतला
77,980 अपात्र महिलांनीही लाभ मिळवला
सरकारची अद्याप कारवाई नाही, विरोधकांचा सवाल