लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांना चाप बसण्यासाठी सातत्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागले असे सरकारने स्पष्ट केले आहे. पण यासाठी सरकारचे पोर्टलच सुरुवातील सक्षम नव्हते. एकाचवेळी अनेक बहिणी ही प्रक्रिया पूर्ण करत असल्याने मध्यंतरी हे पोर्टलचं हँग होण्याचे प्रकार वाढले होते. तर अनेक बहिणींना अनेक तास ताटकळत राहुनही ओटीपी येत नव्हता की प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढली होती. 31 डिसेंबर ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अखेरची तारीख आहे. तांत्रिक अडचणींचा डोंगर लाडक्या बहिणींसमोर उभा ठाकला आहे. आता सरकारने त्यावर उपाय शोधला आहे. ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींचा त्याचा मोठा फायदा होईल.
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा
लाडक्या बहिणीच्या मदतीला केवायसी साठी आता अंगणवाडी सेविका येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देणारी पावले शासनाने उचलली आहेत. योजनेची ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती, पण मोबाईलवर ओटीपी उपलब्ध होण्यात तांत्रिक अडचणी अजूनही आहेत.त्यामुळे आता आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करून ई-केवायसी करता येणार आहे.अनेक महिलांकडून ई-केवायसीची प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येत होते. मात्र, आता अंगणवाडी सेविका स्वतः महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासतील. या अंगणवाडी ताई आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलणार आहे.
2100 रुपये हप्ता केव्हा?
गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये सन्माननिधी देण्यात येईल असे जाहीर केले होते. पण त्याची तारीख त्यांनी सांगितली नव्हती. 1500 रुपये सन्माननिधी सध्या लाडक्या बहिणींना देण्यात येतो. याविषयी अनेकदा विरोधकांनी सरकारवर हल्ला केला आहे. सरकारने लाडक्या बहिणींना फसवल्याचे ते म्हणाले. तर सत्ताधाऱ्यांकडून योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. आता ती योग्य वेळ कोणती हा मात्र प्रश्न आहे.
ई-केवायसी दुरुस्तीची संधी
ई-केवायसी करताना मोठा अडथळा आल्यानंतर जमेल तसे अर्ज सबमिट करण्यात आले. त्यात अनेक त्रुटी आणि चुका असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाचा पुन्हा ताण वाढला. पोर्टल सक्षम नसताना ई-केवायसीचा धोशा लावल्याने हे संकट ओढावले होते. आता सरकारने ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना चुका-त्रुटी केल्या त्यांना त्या आता दुरुस्त करता येणार आहे.