दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. यंदा मंडळाने या भाविकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्याने हा उपक्रम सुरू होऊ शकला नाही.
पेरू कंपाऊंड येथे उभारण्यात आलेल्या अन्नछत्राच्या मंडपाला अग्निशमन दल व पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. भाविकांची सुरक्षा व चेंगराचेंगरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा नकार देण्यात आला. त्यानंतर एफ-दक्षिण विभागाने जागेच्या मालकाला नोटीस बजावली असून 24 तासांच्या आत मंडप हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
लालबागचा राजा मंडळाला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. यंदा सर्वच भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात जेवण देण्याचा संकल्प केला गेला होता. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्याच वर्षी हा उपक्रम अडखळला आहे.
महापालिका कायदा 1888च्या कलम 351 (1) अंतर्गत नोटीस देण्यात आली असून तात्पुरती बांधकामे, साहित्य आणि उपकरणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाविकांना अपेक्षित असलेले अन्नछत्र बंद करण्याची वेळ आली आहे.