छत्रपती संभाजीनगर ते अंकाई या 92 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठीची कामे वेगात सुरू झाली आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत रेल्वे विभागाने गंगापूर, वैजापूर आणि संभाजीनगर तालुक्यांतील जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरु केली असून, 350 शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत.
रेल्वेचे हे दुहेरीकरण अंकाई ते करंजगाव आणि करंजगाव ते छत्रपती संभाजीनगर अशा दोन टप्प्यांमध्ये होत असून, दोन्हीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये अंकाई ते करंजगाव या मार्गावर 30 किमी अंतराच्या जमिनीचे सपाटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या 10 ठिकाणी पुलांचे बांधकाम सुरू आहे.
या गावांतील शेतकऱ्यांना फटका
जमीन संपादनासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने शरणापूर, मिटमिटा, माळीवाडा, बनेवाडी, वंजारवाडी, वाघलगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदेवाडी, खडक नारळा, फतियाबाद, तलेसमन, सावंगी, दायगाव, रोटेगाव, लासूरगाव आदी गावांतील शेतकऱ्यांकडून हरकती मागविल्या आहेत. जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा होणार
या दुहेरीकरणामुळे एकेरी मार्गावरील ताण कमी होणार असून, रेल्वेची प्रवासी व मालवाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या या मार्गाची वापर क्षमता 115 टक्के असून, दुहेरीकरणानंतर ती 143 टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अमृतसर आणि निजामाबादसारख्या लांब पल्ल्याच्या गंतव्यस्थानांपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत. यामुळे औद्योगिक मालवाहतुकीला चालना मिळेल. 98 लाख लोकसंख्या व 38 गावांना थेट फायदा होईल.
प्रकल्पासाठी वेळेचे बंधन
मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले की, "दुहेरीकरणाच्या कामाला गती दिल्यास हा प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन्ही टप्प्यांसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी नियोजनबद्ध व वेगवान काम करण्याची आवश्यकता आहे."