ताज्या बातम्या

Ajit Pawar : मोठी बातमी! अखेरच्या क्षणी अजित पवारांना धक्का; तडकाफडकी राजीनाम्याने राष्ट्रवादीत खळबळ

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख असताना, जळगावमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Published by : Riddhi Vanne

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख असताना, जळगावमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि जागावाटपावरून सुरू असलेली अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली असून, या घडामोडीचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागावाटपावरून मतभेद, राजीनाम्याचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महापालिका निवडणुकीत जागा लढवण्यावरून अभिषेक पाटील यांचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाले होते. हे मतभेद टोकाला गेल्यानंतर अभिषेक पाटील यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, पक्षात दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.

समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू

दरम्यान, अभिषेक पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. अभिषेक पाटील यांच्या आई तसेच अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारी कल्पनाबाई पाटील यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी आमदार मनीष जैन यांनी अभिषेक पाटील यांच्याशी संवाद साधत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. “पाटील यांची जी काही नाराजी असेल ती दूर करण्यात येईल,” असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अभिषेक पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहतात की राजीनामा मागे घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जळगावमध्ये महायुतीची घोषणा

या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान, जळगाव महानगरपालिकेसाठी महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी याबाबत माहिती दिली.

देवकर यांच्या माहितीनुसार, जळगाव महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सहा जागा देण्यात येणार आहेत. उर्वरित जागांवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहेत. राज्य सरकारप्रमाणेच जळगाव महापालिकेतही महायुतीचा प्रयोग पाहायला मिळणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी अडचण

एकीकडे महायुतीची घोषणा होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षांचा राजीनामा ही पक्षासाठी मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेली ही घडामोड राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा