इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 9 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी दिली आहे. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी संपलेली असताना आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयीत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
या सुनावणीत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांनी प्रशांत कोरटकरचा जामीन मंजूर केला. त्यामुळे लवकरच कळंबा कारागृहातून प्रशांत कोरटकरची सुटका होणार आहे. याचपार्श्वभूमीवर इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
असीम सरोदे काय म्हणाले ?
असीम सरोदे म्हणाले की, "प्रशांत कोरटकर याला जामीन मंजुर झाला आहे. पण मला असं वाटतं की, केवळ तांत्रिक कायदेशीर विचार केला तर, कोणत्या कलमांखाली प्रशांत कोरटकरला शिक्षा झाली आणि त्याच्यामागे तीन वर्षे शिक्षेची तरतूद असल्याने न्यायालयाने जामीन दिला असावा. परंतू याविषयी नाराजी व्यक्त करावी असे मला वाटते.
"कारण तपास पुर्ण झाला नसल्याचे पोलीस वारंवार म्हणत होते. प्रशांत कोरटकर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि सहा शहरांमध्ये लपून बसला होता. या काळात त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली. तसेच इतर प्रकारची मदत कोणी केली, याचा तपास पूर्ण झालेला नाही. प्रशांत कोरटकर वर दोन वेळा न्यायालयाच्या आवारात हल्ला झालेला आहे. त्यामुळे तो जेलमध्ये जास्त सुरक्षित आहे".
"कोर्टाच्या आधीच्या एका निर्णयानुसार आरोपी जेलमध्ये जास्त सुरक्षितता असताना त्याला जामीन देऊ नये असे म्हटले आहे. तरीही प्रशांत कोरटकरला आज जामीन करण्यात आला. ज्या अटींवर त्याला जमीन मंजूर झाला आहे, त्या अटींचे पालन त्याने केलं पाहिजे नाही तर त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली जाऊ शकते", असं इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे म्हणाले आहेत.