"मनोज जरांगे हा अतिशय भंपक माणूस आहे. ते उपोषणाला बसतील, त्या दिवशी आम्ही मुंबईकडे लाँग मार्च करू," असा थेट इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा वादळ निर्माण झालं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. याला उत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी आज, बुधवारी जाहीर पत्रकार परिषदेत कठोर भाषेत प्रतिक्रिया दिली. "सरकारने जरांगे यांना फार महत्त्व देऊ नये, आमच्या ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे," असे हाके म्हणाले.
हाके यांचा आरोप आहे की, "सुमारे 8 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटपामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. दोन कोटी मराठ्यांना जर ओबीसीमध्ये समाविष्ट केलं, तर आमची घटनात्मक चौकटच मोडेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याचे उत्तर द्यावं लागेल," असा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनीही आपल्या शैलीत सरकारला थेट इशारा दिला आहे. "28 ऑगस्टपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर विजयाचा रथ किंवा अंत्ययात्रेचा रथ यापैकी एकच रथ मुंबईहून परत येईल," असं सांगत त्यांनी आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला.
राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असून, पुढील काही दिवस हे आंदोलन कोणत्या वळणावर जातं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.