हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे मंगळवारी वयाच्या 89 वर्षी निधन झाले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि स्वतंत्र चित्रपट निर्मिती या भूमिका निभावत त्यांनी सिनेमा विश्वात वेगळी ओळख निर्माण केली होती.
अमेरिकेतील युटा राज्यातील त्यांच्या राहत्या घरी रेडफोर्ड यांनी प्राण सोडले, अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी अधिकारी सिंडी बर्गर यांनी दिली. मृत्युसमयी त्यांच्या जवळ कुटुंबीय उपस्थित होते. मात्र, त्यांच्या निधनाचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.
1960 च्या दशकात रेडफोर्ड यांना स्टारपद मिळाले, तर 1970 च्या दशकात ते हॉलिवूडमधील प्रमुख कलाकार म्हणून उदयास आले. द कॅंडिडेट, ऑल द प्रेसिडेंट्स मेन आणि द वे वी वेअर यांसारखे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले. 1980 मध्ये ऑर्डिनरी पीपल या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर मिळाला, तर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मानही पटकावला.
दीर्घ कारकिर्दीत रेडफोर्ड यांनी जेरेमिया जॉन्सन, ऑल इज लॉस्ट (2013) आणि द ओल्ड मॅन अँड द गन (2018) यांसारख्या भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली. देखणे व्यक्तिमत्त्व असूनही साध्या माणसांच्या व्यक्तिरेखा साकारण्याची त्यांची तयारी आणि कमी बजेटच्या चित्रपटांना व्यासपीठ देण्याची त्यांची धडपड यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरले. त्यांच्या जाण्याने हॉलिवूडसह जागतिक चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.