थोडक्यात
नाशकात बिबट्याची दहशत ,
नागरिक वस्तीत शिरला होता बिबट्या
शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश...
नाशिकच्या कामगार नगरमध्ये धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. बिबट्याला वनविभागाच्या पथकातील जवानाने डार्ट मारुन बेशुध्द केले. कामगार नगरमधील एका सोसायटीत त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
दरम्यान, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात परिसरातील पाच ते सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सुरवातीस या परिसरात दोन बिबटे असल्याचा परिसरातील नागरिकांनी दावा केला होता. मात्र अखेर या ठिकाणी एकच बिबट्या असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. वनविभागाने घटनास्थळी तत्काळ दाखल होत बिबट्याचा शोध सुरु आहे. या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वनविभागाच्या रेस्क्यू टीममधील दोन जवान जखमी झाले आहे.
या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, आमदार सिमा हिरेंसह काही पदाधिकारी ही दाखल झाले होते. ते या परिस्थीतीवर लक्ष ठेवून होते. गंगापूर रोड परिसर हा दाट नागरी वस्ती असलेला परिसर असून या भागात अचानक बिबट्या दाखल झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, वनविभागाच्या प्रयत्नांमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.