मुंबई प्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या डिसेंबरमध्ये ठाणे शहरात नवी मेट्रो सेवा कार्यान्वित होणार असुन, वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख 4 अ नव्या मार्गिकेमुळे ठाणे शहराला पहिली मेट्रो मिळणार आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सुखकर आणि मजबुत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रोचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि वेळेत होऊ लागला आणि प्रवाशांना ही मेट्रोचा पर्याय अधिक सोईस्कर वाटू लागला. मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी ची मार्गिका असुन ह्या मार्गिकेवर एकूण 32 स्थानके आहेत.
तीन टप्प्यांमध्ये ही मार्गिका विभागली असुन याचे जवळजवळ 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामधील कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा 2025 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा टप्पा पूर्ण होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस ठाणेकरांना गारेगार मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.
सध्या गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर ट्रायल रन्स घेतल्या जाणार असुन त्यानंतर मेट्रो गाड्यांची चाचणी केली जाणार आहे. कॅडबरी जंक्शन,माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवणीपाडा आणि गायमुख या स्थानकातून ही मेट्रो रेल्वे धावणार असुन वर्षाअखेरीस डिसेंबर पर्यंत हि मेट्रो मार्गिका सुरु करण्याचा MMRDA चा प्लॅन आहे.