फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी भारतात दाखल झाल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. GOAT इंडिया टूर 2025 ची सुरुवात कोलकात्यातून झाली असून शनिवारी पहाटे मेस्सी शहरात पोहोचला. एअरपोर्टपासून स्टेडियमपर्यंत रस्त्यांवर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण रात्रभर थांबले होते.
या दौऱ्यात मेस्सी कोलकात्यानंतर हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली येथे जाणार आहे. 2011 नंतरचा हा त्याचा दुसरा भारत दौरा आहे. दरम्यान, एका अनोख्या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधले. एका नवविवाहित जोडप्याने मेस्सीच्या भेटीसाठी आपला हनीमून रद्द केला.
या जोडप्याने सांगितले की, लग्नानंतर सहलीची तयारी पूर्ण होती. मात्र मेस्सी येणार असल्याची बातमी समजताच त्यांनी प्रवास रद्द केला. गेली अनेक वर्षे आम्ही मेस्सीचे चाहते आहोत. त्याला प्रत्यक्ष पाहणे हे आमच्यासाठी खास क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “मेस्सी आमच्यासाठी फक्त खेळाडू नाही, तर प्रेरणा आहे. त्याला पाहणे आमच्यासाठी कोणत्याही सहलीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.” मेस्सीच्या आगमनामुळे संपूर्ण कोलकाता फुटबॉलच्या रंगात रंगले आहे. दरम्यान, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये काही वेळातच गोंधळ निर्माण झाला. मेस्सी काही मिनिटांत निघून गेल्याने चाहते नाराज झाले. गर्दी अनियंत्रित होत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मेस्सीला तात्काळ हॉटेलकडे पाठवण्यात आले. परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.