ताज्या बातम्या

Sanjay Raut : ‘स्थानिक निर्णय आमची भूमिका नाही’;राऊतांची चंद्रपूर प्रकरणावर प्रतिक्रिया

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे.

Published by : Varsha Bhasmare

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या राजकीय समीकरणांमध्ये अखेर भाजपने सत्ता स्थापन करत आपला महापौर बसवला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे.

महापालिकेत सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे 3 सदस्यही काँग्रेससोबत होते. तरीही भाजपने 23 जागांसह शिवसेना ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत सत्तेची समीकरणे आपल्या बाजूने वळवली. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे 2, बसपाचा 1, शिवसेना (शिंदे गट) 1, अपक्ष 2 आणि एमआयएम 1 असे इतर सदस्य आहेत. एकूण 66 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेली संख्या गाठत भाजपने महापौरपद पटकावले.

दरम्यान, ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगल्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. “चंद्रपूरमध्ये स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय हा पक्षाची अधिकृत भूमिका नाही. भारतीय जनता पक्षासोबत सत्तेसाठी जाण्याची आमची भूमिका नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला. “स्थानिक नेत्यांनी स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल,” असेही राऊत यांनी सांगितले. चंद्रपूरमधील घटनेचे पक्षातून कुणीही समर्थन केले नसल्याचे सांगत त्यांनी मुंबई महापौर निवडणुकीच्या वेळी पक्षाने घेतलेली स्पष्ट भूमिका आठवली. तसेच परभणी महापालिकेत काँग्रेसने ठाकरे गटाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले.

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर संजय राऊत यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले. “ज्यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला, ते स्वतः भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का? त्यांचा 20 टक्के कमिशन होता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर महानगरपालिकेतील या सत्तांतरामुळे स्थानिक राजकारणासोबतच राज्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या घडामोडींवरून आणखी राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा