आज 'लोकशाही मराठी' चॅनेलतर्फे 'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' सोहळा नुकताच पार पडला. मराठवाड्यामधील रत्नांचा सन्मान केला गेला. यावेळी मराठवाड्यातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. राजकीय, सामाजिक, मनोरंजन या क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. गायन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजे मंगेश बोरगावकर. मंगेश बोरगावकरचादेखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला. यावेळी मंगेशबरोबर दिलखुलासपणे गप्पा झाल्या.
मंगेश बोरगावकर हा 'सारेगमप' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला. मंगेशच्या आवजाचे महाराष्ट्रभरात अनेक चाहते आहेत. कार्यक्रमावेळी मंगेशने सारेगमप कार्यक्रमाच्या निवडीच्या वेळचा एक प्रसंग शेअर केला. मंगेश म्हणाला की, "कोल्हापूरला आम्ही फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी तेव्हा सारेगमपच्या ऑडिशन्स होत्या त्यावेळी मी 11 वीला होतो. माझी निवडदेखील झाली होती. त्यावेळी हा एक नवीन अध्याय सुरु झाला होता".
पुढे तो म्हणाला की, "त्यावेळी कार्यक्रमाचे स्वरूप वेगळे होते. आतासारखे व्यावसायिक स्वरूप त्यावेळी कार्यक्रमांना नव्हते. आम्ही त्यावेळी खूप शिकलो. माझ्यासाठी तो क्रॅश कोर्स होता".